Thursday, July 30, 2009

संकेत

नको झाले देवा दू:खाचे जगणे
आयुष्याची गोडी पुरे झाली
जीवनाचे नाते मनाशीच तुटे
आता सोसवेना नको वाटे
वाहतो मी देवा न उमलत्या कळ्या
दुःखार्त या जीवा तसे वाहावे वाटे
दुःखार्त आक्रोष डोळी शोकधारा
मिटुनिया नेत्र आकांत केला
थकलो थकलो जीवनाशी झगडलो
पण नाही अंत झाला यातनांचा
उपयोग व्हावा हीच मनी आस
पण स्वार्थाने केवळ मज वापरले
प्रहर आकांत निर्गत वेदना
शांत भावनेने उघडले डोळे
पाहतो फुलल्या न उमलत्या कळ्या
जीवनाचा गंध त्यांनी विखुरला
माझिया मनांस देवाचा संकेत
बघ त्यांचे जगणे मरणांत
फुलल्यावाचून कळी न सोडे प्राण
जगण्यावाचून व्यर्थ ते मरण
तुझ्यासाठी तुझे मरण संपले
आता फक्त श्वास फुलण्यास
तुझ्या जीवनाचा उधळी सुगंध
फुलणे आनंद आत्मरंगी

न मी उरावे

आर्त मी तृषार्त मी, तू तृप्त जलाचा घोट व्हावे
तो स्पर्श हवासा घेण्यासाठी सर्वांगाने ओठ व्हावे
भान मी बेभान मी, तू निर्झरी निर्बंध व्हावे
त्या तुषारी चिम्बन्या मी पत्थरी सानंद राहावे
रान मी वैराण मी, तू धुंद वाऱ्याने फिरावे
लहर लहर अन्गामधूनी नसोनसी वारे उरावे
भास् की आभास तू , तू अंतरी व्योमी राहावे
व्यापूनी स्वत्वास माझ्या तूच तू न मी उरावे

Wednesday, July 29, 2009

प्राजक्त

फान्दीफान्दीवर तेवल्या,प्राजक्ताच्या फूलवाती
सूर्य जन्मण्या उषेला, त्यांच्या प्राणांची आहुती
शिम्पे प्राजक्ताचे रेत ,धरा उषेच्या कुशीत
आकाशाच्या उदरात ,सूर्यगर्भाचे जीवित

प्रारब्ध

कोटयावधी जीवनांच्या अमीट वासना
चिकटल्या आहेत माझ्या मनाला
सुखाचा उन्माद , दू:खाचा आक्रोष
तृष्णेची ओढ़ , अत्रुप्तीचा क्रोध
अनिश्चित आयुष्याचे , क्षणिक भोग
अकल्पित प्रारब्धाचे , निर्दयी घाव
जीवनाचा संघर्ष घोर असूनही
न संपणारी जगण्याची हाव
जगण्याची आसक्ती , भोगांची ओढ़
अस्तित्वाच्या शोधाचे , अनंत सायास
जीवन म्हणजे सुखाच्या आशेने
दू:खाच्या वाटेवर चाललेला निरंतर प्रवास

Tuesday, July 28, 2009

मातीचा पक्षी

पंखावारती आभाळ तोलून
वारा पिवून
फिरतो आहे
आकाशाचे हृदय घेवून
मातीच्या देहाचा
पक्षी पहा उडतो आहे

Monday, July 27, 2009

अनिवार

अजुनही निळ्या नभाचा ताजेपणा सरेना
माझ्या आकर्षणाचे नाविन्य ओसरेना
कायेवरी लकाके तारुण्य शाश्वताचे
स्पर्शात त्या सुखाची जाणीव सोसवेना

बालपण

बालपण म्हणजे शरद रात्री आभाळ रुप्याने माखलेलं
कृष्णमेघाचं मळभ टाकून टिपूर चान्दणं राखलेलं
बालपण म्हणजे गुजगाण फुलपाखरांनी बोललेलं
बालपण म्हणजे स्वप्नपान आशेवरती झेललेलं
बालपण म्हणजे असचं काही कुतुहलाच्या बघण्याचं
फडफडणारया ज्योतिलाही हातात धरू धजन्याचं
बालपण म्हणजे अल्लड़पन बकुळफुलं वेचलेलं
आरस्पानी पान्याप्रमाने डोन्गरतळी खेचलेलं
बालपण म्हणजे गानसूर बासरीतून प्रकटलेले
बालपण म्हणजे रानफूल चंद्र होवून चिकटलेले
बालपण म्हणजे एक साद सात डोंगरी घुमणारी
बालपण म्हणजे एक जाग जीवनफुल हुंगणारी

दवं: काही कल्पना

1
कृष्ण यशोदेचा कान्हा काल अंधारात आला
आकाशाच्या स्तनातले दूध चांदण्याचे प्याला
मुक्त हास्याने तृप्तीच्या ओठ त्याचे विलगले
थेंब दूधाचे पडले त्याचे दहीवर झाले
मुक्त चांदण्यांच्या सरी उषा उल्हासून न्हाली
तिच्या अंगातून ओल्या दवं ओघळले खाली
त्याची विरहाची व्यथा रात्र अंधारून आली
मुक्त मिठीत धरेच्या नभ झेपावले खाली
स्तब्ध मिठीत संपले प्रहरांचे श्वास त्यांचे
दु:ख संपता संपेना त्याच्या एकाकी मनाचे
सुन्न मनाने निघाले नभ परतूनी जाया
चांदण्याच्या आसवांनी न्हाली धरतीची काया
व्यथा आकाशाची तिने फूल ओठाने टिपली
प्रभातीच्या किरणांची वाट नभाने शिंपली

नवजन्माचा आनंद

रंग ओल्या मातीचा गं पोरी तुझ्या काळजातं
माझी आकाशाची रीत तुझी धरतीची जात
माझी अस्तित्वाची जागं जागे तुझ्या संगतीत
माझ्या पोकळ विश्वाला तुझी पार्थिव सोबत
माझ जगणं सांडलं तुझ्या कुशीत रुजलं
बीज तरारून त्याचं पुन्हा मलाचं भिडलं
माझ्या चेतनेस लाभे तुझ्या अस्तित्वाचा गंध
निराकार जगण्यास नवजन्माचा आनंद

पृथ्विचे प्रेमगीत

प्रेम पृथ्वीचे गीत कुण्या कवीने गाईले

क्षुद्र शृंगारा लेखूनी दूरत्त्वाला प्रशंसिले

कवी सात्विक सागर भोळा विश्वास अंतरी

गूढ़ ओढ़ मिलनाची पाहू शकेना नजरी

रश्मीकरांनी धरेचे अंग अंग आलिन्गले

अनावर भावनांचे रेत नभाने शिम्पले

प्रेम मनाचा हिदोळा झूले अंगा अंगावर

प्रेम सगुण साकार रूप भोगतो ईश्वर

दूरतेला शाप लाभे दूजे अस्तित्व भोगने

ओढ़ अद्वैताची त्याला वृथा वासना लेखने

इच्छा द्वेष काम क्रोध द्वैता वासनेच्या कळा

अद्वैताच्या दरबारी फक्त आनंद सोहळा

सार

जाणीवहीन अस्तित्त्व , संवेदनशून्य भावना
उदात्त ध्येयाच्या प्रेतातील दाट कुबट वासना
निरुद्देशी श्वासाच्या
केविलवाण्या निर्जीव प्रवाहावर
अंती
मृत्यूचा क्रूर शहारा
देहाच्या साठलेल्या उकीरड्यावर
आयुष्यभर दाटलेल्या अशा जगण्याचा
एक दुर्गंधी सुस्कारा

Thursday, July 23, 2009

कोलंबसचा प्रवास

शोधासाठी अस्तित्वाच्या आटापिटा चालू आहे
सुखासाठी विज्ञानाचा यन्त्ररेटा चालू आहे
संघर्षात जीवनाच्या सुख कधी मिळेल काय
वेगामध्ये शान्ततेच बीज तरी फळेल काय
वर्तुलाच्या आसावरची धाव त्यांची मोठी आहे
पोहचेल त्या साध्याभोवती गच्च आमची मीठी आहे
गुपित सारं अस्तित्त्वाचं छातीमध्ये दडलं आहे
विश्वामधल्या रहस्याचं उत्तर तिथे पडलं आहे
लुटण्यासाठी शाश्वत धन शिडात हवा भरत आहे
याच दिशेला कोलंबसच जहाज पुढे सरत आहे
चिरसुखाची तहान त्याला खेचल्याविना राहील काय
साफल्याविन जीणं त्याला बोचल्याविना राहील काय
अरे अमेरीका अमेरीका एवढं काय नाव आहे
कोलम्ब्सच्या प्रवासात ते वाटेवरचं गाव आहे

Tuesday, July 21, 2009

जगराहाट


संवेदना जयांची शब्दात सापडे
प्रतिभा तयास म्हणती जगती हे बापुडे
कोणांस वेदनांनी नि:शब्द स्तब्ध केले
मौनात गुम्फिले जे , ते काव्य व्यर्थ गेले
स्वानंदी गुन्तिले जे त्या भोगवासनांच्या
त्या वांझ रतोत्सवाची वाहवा जगात झाली
नि:शब्द निर्मितीच्या ज्यांनी कळा सहाव्या
त्या धन्य सृंजनाची पर्वा कुणांस नाही

संध्यासखी

संध्यासखी

अंधाराच्या काळजात

तुझा हात

चांदण्यात विखुरली

दिवसाची

तुझी कात

जाणीव

अजुनही निळ्या नभाचा ताजेपणा सरेना
माझ्या आकर्षणाचे नाविन्य ओसरेना
कायेवरी लकाके तारुण्य शाश्वताचे
स्पर्शात त्या सुखाची जाणीव सोसवेना