Wednesday, August 26, 2009

मना-मनाचे कोमल नाते, आपुलकीचे प्रेमळ बंध

स्नेहावाचून कसा मिळावा , जगण्यातील निर्मळ सुगंध

जगण्याचे सामर्थ्य मिळवूया

जीवन सुंदर चला घडवूया

अपेक्षांचे अवघड ओझे, नात्यांचे चैतन्य चोरते,

स्वार्थापुरते जगणे निर्मम , दू:खाचे प्रारब्ध कोरते

अधिकाराच्या भाषेवाचून , प्रेमाचा संवाद घडवूया

जीवन सुंदर चला घडवूया

पवित्रतेचे चिंतन सुंदर, धडा दाखवू वागणुकीचा

आणी जपूया एक तेवता, दिवा अंतरी माणुसकीचा

परस्परांच्या विश्वासाने , व्यवहाराची वाट चालूया

जीवन सुंदर चला घडवूया

स्वतंत्र आपण, समर्थ आपण , ठाम खूण ही मनांत बांधू

आप-परान्तील विश्वासाचा, पूल मनामनांतून सांधू

जगण्यावरच्या भक्तीमधूनी , शक्ती मिळवू या

जीवन सुंदर चला घडवूया

जीवन मिळते , जसे चिन्तीतो , विचार घडवे सृष्टी

नव्या जगाला, चला पाहूया , जरा बदलूनी दृष्टी

चैतन्याला मुक्त करूनिया , उधळून देवूया

जीवन सुंदर चला घडवूया

भीती कसली पराभवाची , सोडू जगणे उदासवाणे

चला उठूया आनंदाने , गावून टाकू जीवनगाणे

हात - मनाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवूया

जीवन सुंदर चला घडवूया

No comments: