Thursday, July 30, 2009

संकेत

नको झाले देवा दू:खाचे जगणे
आयुष्याची गोडी पुरे झाली
जीवनाचे नाते मनाशीच तुटे
आता सोसवेना नको वाटे
वाहतो मी देवा न उमलत्या कळ्या
दुःखार्त या जीवा तसे वाहावे वाटे
दुःखार्त आक्रोष डोळी शोकधारा
मिटुनिया नेत्र आकांत केला
थकलो थकलो जीवनाशी झगडलो
पण नाही अंत झाला यातनांचा
उपयोग व्हावा हीच मनी आस
पण स्वार्थाने केवळ मज वापरले
प्रहर आकांत निर्गत वेदना
शांत भावनेने उघडले डोळे
पाहतो फुलल्या न उमलत्या कळ्या
जीवनाचा गंध त्यांनी विखुरला
माझिया मनांस देवाचा संकेत
बघ त्यांचे जगणे मरणांत
फुलल्यावाचून कळी न सोडे प्राण
जगण्यावाचून व्यर्थ ते मरण
तुझ्यासाठी तुझे मरण संपले
आता फक्त श्वास फुलण्यास
तुझ्या जीवनाचा उधळी सुगंध
फुलणे आनंद आत्मरंगी

न मी उरावे

आर्त मी तृषार्त मी, तू तृप्त जलाचा घोट व्हावे
तो स्पर्श हवासा घेण्यासाठी सर्वांगाने ओठ व्हावे
भान मी बेभान मी, तू निर्झरी निर्बंध व्हावे
त्या तुषारी चिम्बन्या मी पत्थरी सानंद राहावे
रान मी वैराण मी, तू धुंद वाऱ्याने फिरावे
लहर लहर अन्गामधूनी नसोनसी वारे उरावे
भास् की आभास तू , तू अंतरी व्योमी राहावे
व्यापूनी स्वत्वास माझ्या तूच तू न मी उरावे

Wednesday, July 29, 2009

प्राजक्त

फान्दीफान्दीवर तेवल्या,प्राजक्ताच्या फूलवाती
सूर्य जन्मण्या उषेला, त्यांच्या प्राणांची आहुती
शिम्पे प्राजक्ताचे रेत ,धरा उषेच्या कुशीत
आकाशाच्या उदरात ,सूर्यगर्भाचे जीवित

प्रारब्ध

कोटयावधी जीवनांच्या अमीट वासना
चिकटल्या आहेत माझ्या मनाला
सुखाचा उन्माद , दू:खाचा आक्रोष
तृष्णेची ओढ़ , अत्रुप्तीचा क्रोध
अनिश्चित आयुष्याचे , क्षणिक भोग
अकल्पित प्रारब्धाचे , निर्दयी घाव
जीवनाचा संघर्ष घोर असूनही
न संपणारी जगण्याची हाव
जगण्याची आसक्ती , भोगांची ओढ़
अस्तित्वाच्या शोधाचे , अनंत सायास
जीवन म्हणजे सुखाच्या आशेने
दू:खाच्या वाटेवर चाललेला निरंतर प्रवास

Tuesday, July 28, 2009

मातीचा पक्षी

पंखावारती आभाळ तोलून
वारा पिवून
फिरतो आहे
आकाशाचे हृदय घेवून
मातीच्या देहाचा
पक्षी पहा उडतो आहे

Monday, July 27, 2009

अनिवार

अजुनही निळ्या नभाचा ताजेपणा सरेना
माझ्या आकर्षणाचे नाविन्य ओसरेना
कायेवरी लकाके तारुण्य शाश्वताचे
स्पर्शात त्या सुखाची जाणीव सोसवेना

बालपण

बालपण म्हणजे शरद रात्री आभाळ रुप्याने माखलेलं
कृष्णमेघाचं मळभ टाकून टिपूर चान्दणं राखलेलं
बालपण म्हणजे गुजगाण फुलपाखरांनी बोललेलं
बालपण म्हणजे स्वप्नपान आशेवरती झेललेलं
बालपण म्हणजे असचं काही कुतुहलाच्या बघण्याचं
फडफडणारया ज्योतिलाही हातात धरू धजन्याचं
बालपण म्हणजे अल्लड़पन बकुळफुलं वेचलेलं
आरस्पानी पान्याप्रमाने डोन्गरतळी खेचलेलं
बालपण म्हणजे गानसूर बासरीतून प्रकटलेले
बालपण म्हणजे रानफूल चंद्र होवून चिकटलेले
बालपण म्हणजे एक साद सात डोंगरी घुमणारी
बालपण म्हणजे एक जाग जीवनफुल हुंगणारी