Monday, January 11, 2010

अलविदा मि. गांधी.....अलविदा

हेलो मि.गांधी,
ओळखलंत मला?
कसं शक्य आहे!?
आपल्याच मृत्यूला ओळखण्याचे भाग्य फार थोडया जणांना लाभतं.
पण तुमच्या डोळयात हे काय तरळतयं मि. गांधी?
भीती!!?
नाही,नाही,
प्रश्नचिन्ह ? कशाबद्दल ??
ओहो ! कमाल आहे तुमची मि.गांधी!!
मरतानाही वकीलपण जात नाही तुमचं.
हो, पण असू दे.
मलाही तुम्हाला ते सांगायलाच हवं.....कारण
असेच प्रश्न घेवून गेलात निरुत्तर तर...
एखादं पिशाच्च बनून पुन्हा याल
आणि बसाल पुन्हा इथल्या
हळव्या मनांच्या मानगुटीवर.
जीवनाचं रांगडं वास्तव पचवू न शकणारी, ही भित्री मने,
पुन्हा करतील तुमचाच जयजयकार!
नो नो नो मि. गांधी....
हे सगळं आता थांबवायलाच हवं....त्यासाठीच...
त्यासाठीच..तुमच्या डोळ्यातील ही प्रश्नचिन्हे मावळायला हवीत...कारण
कारण काय आहे मि. गांधी, तुमच्या त्या प्रश्नचिन्हांमध्ये विष आहे
मानवी मनाला जखडणारं.
म्हणून मि. गांधी तुम्हाला गेलचं पाहिजे.... नि:शंक!
करुणेच्या , प्रेमाच्या धाग्यातून ,
कसला प्रयत्न करताय गांधी तुम्ही....
व्यवस्था निर्माण करण्याचा?
आणि ही करुणेची महतीही तुम्ही सांगताय कुणाला?आम्हाला??
अहो, इथून तर बुध्दही हद्दपार केलाय आम्ही!
व्यवस्था कधीही करुणेतून निर्माण होत नाही....सत्तेतून होते
तुम्हाला हे सत्य कधीच कळले नाही मि. गांधी.
या केवढ्या मोठ्या असत्यावर प्रयोग चालू होता तुमचा!
मि. गांधी हाच होता तुमचा खरा गुन्हा!!
आणखी एक मि. गांधी, हे तुम्हीच म्हणायचा ना की
जग बदलण्याचा प्रयत्न करू नका म्हणून...
आणि तुम्हीच करत राहीलात प्रयत्न....छाती फुटेस्तोवर
काय तर म्हणे....एका वर्षात स्वराज्य आणि
एका जन्मात रामरा़ज्य स्थापन करण्यासाठी!!
पण तुमच्या या अशक्य स्वप्नांना,
आम्ही भुललो नाही मि. गांधी.
पुरतं जोखलं आहे तुम्हाला आम्ही.
आत्मबलावर आधारीत श्रेष्ठ समाजाच्या निर्मितीची
स्वप्न बघणारे तुम्ही...
तुम्ही तर आमच्याच जीवावर उठलात!
वंशश्रेष्ठत्वाचा, वर्णश्रेष्ठत्वाचा, अस्तित्वाचा अहंकार
हाच तर आमच्या जीवनाचा आधार!!
तो आधारच काढून घेण्याचा तुमचा कावेबाजपणा
वेळीच ओळखला आम्ही मि. गांधी
आणि अस्तित्वाचाच प्रश्न आल्यावर
डार्विन काय सांगून गेला ठाऊक आहे ना तुम्हाला
"Survival of the fittest!!!"
मग तुम्हीच ओळखा मि. गांधी
तुमच्या सारख्या दुबळ्या शरीराच्या जर्जर म्हातार्‍याने
जगायचं की आम्ही?
म्हणून तुमचा मृत्यू हा काही अधर्म वा खून नाही मि. गांधी
निसर्गाच्या नियमाप्रमाणे आम्ही आहोत बांधील
आमच्या आतील....अस्तित्वाच्या....आदिम भीतीला...आणि पाशवी नीतीला
जगण्याचा आमचा हक्क अबाधित राहण्यासाठी
तुमचा मृत्यू निश्चित आहे मि. गांधी.
नो नो नो,
मला पटवून देण्याचा कोणताच प्रयत्न करू नका
मी कानावरती घट्ट स्कार्फ बांधून आलो आहे
तुमचे ते भुलविणारे शब्द ऐकायचे नाहीत मला
माझा निर्णय पूर्ण झालाय...
हे पहा, हे पहा मि. गांधी,
मी वाकलोय क्षणभर तुमच्या पायावर...नमस्कारासाठी
ही माझी कृती केवळ माझ्या त्या अज्ञानापोटी
जग तरीही तुम्हाला का मानतं हे मला कधीच कळलं नाही म्हणून
आणि या पहा माझ्या हातातील पिस्तुलातून.....
सुटतील आता गोळ्या....तुमची वृध्द छाती भेदण्यासाठी.
एक सूचना आहे मि. गांधी
फक्त मरताना थोड्या मोठ्या आवाजात म्हणा
तुमचे ते ....हे राम की राम राम !
मि. गांधी, मि. गांधी,
आणखी एक शेवटचा सल्ला ऐकून जा...निर्वाणीचा
परमेश्वराशी तुमची जर जराही जवळीक असेल ना ...तर
तर मग मागा त्याच्याजवळ मुक्ति तुमच्यासाठी.
पुन्हा याच भूमिवर येण्याची चूक करू नका.
आमच्याच माणूसपणावर शंका घेणारे,
प्रश्न नको आहेत आम्हाला....मि.गांधी
अलविदा मि. गांधी.....अलविदा

ठो..........ठो...........ठो

Monday, October 19, 2009

प्राचिन शहाणपण..!

समोर आहे माझ्या
हजारो वर्षांचं मानवी जीवनाचं प्राक्तन....इतिहास बनून!
समरसून, रसरसून जगलेल्या
अशाच उत्कट जगण्यांच्या..
स्मृतींचे भग्न अवशेष!!
नृपांच्या वैभवी विलासाची,
सम्राटांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेची,
ययातीच्या अमीट वासनेची..... अंतिम विफलता.....थडग्यात ओघळ्णारी...
सिकंदराच्या रिक्त हातांसारखी!!
मी पाहिलयं...
जगण्याचं भव्य दर्शन,
विचार, वासनांचं विराट जग....कल्पनांनी सजलेलं...पण
अस्तित्वाच्या मुळापासून तुटलेलं!
माझ्यावरच लादलेली मी...जीवनाची फसवी माया!!
जगण्याच्या अखंड कोलाहलातून जेव्हा होतो मी क्षणभर अलिप्त
अन पोहचतो स्वतःपाशी, तेव्हा पाहतो
जीवनाने चालविलेली क्रूर विटंबना माझीच अन
जगण्याच्या अट्टाहासातून मी स्वतःच रचलेला ...माझा मृत्यू!
जो कंठरवाने मला सांगतो
"मी" जगतो तेव्हा मी खरंतरं मरत असतो
म्हणून अस्तित्वाच्या समग्रतेसह.....पुन्हा नव्याने जगण्यासाठी...
हवाय मृत्यू मला...!!
माझ्या इच्छा, आकांक्षा,वासना व आशेचा.....कारण
जीवनाशी जुडण्याचा अन्य कोणताच मार्ग नाही.
अनंत जीवनांच्या अनुभवांच ...प्राचिन शहाणपण..तेव्हा
अनाहताच्या ठाम स्वरातून..माझ्या मनात कुजबुजतं
"मी" मरतो तेव्हाच मी खरा जगत असतो

Saturday, September 26, 2009

अन मी राधा ना उरले

वृंदावनात घुमता । अजूनही बासरी धून।
जागते वक्षावरची। ती कृष्णव्रणांची खूण ॥

उद्दाम स्तनांवर रुतता । त्या कृष्णसख्याचा भार।
हृदयातून अस्फुट फुटला। तो प्रणवाचा हुंकार॥

प्रणयात जागता सूर्य। स्पर्शाने रचला पुल।
द्वैताचे भानही सुटले। मज मोरपिसाची भूल॥

प्रेमाची भरती येता। देहाचे रांजण भरले।
चंद्राचा मज सांगावा। मी दिव्यत्वाला वरले॥

तो अणुरेणूतूनि फुटता। मी माझे मीपण हरले।
तो कृष्ण कृष्ण ना उरला। अन मी राधा ना उरले॥

Friday, September 25, 2009

थेंबाशी भिडतो सूर्य.....

मातीचा पाश तळाला
पानांच्या रुतल्या रेषा
परि फुलपाखरू उडते
स्वप्नांच्या अवघड देशा

थेंबाशी भिडतो सूर्य
किरणांचे दाहक जाळे
गर्भात रूजविली त्याने
का इंद्रधनूची बाळे?

पेशींनी रचला देह
प्रेताचे प्राक्तन त्यास
मग संकेतांनी कसल्या
मजला जगण्याचा भास!

Monday, September 21, 2009

उषा राणी

सुषुप्तीच्या मानेवरती
तव हातांची
मधाळ गुंफन
अस्तित्वाच्या जागेसाठी
तव अधरांचे
प्रसन्न चुंबन!
तृप्त डवरल्या अंगाने
आऱक्त कोवळ्या रंगाने
अंधाराची सारून चादर
दिवसावरती पसरतेस तू
तू...... सूर्याची
प्रकाश घागर.

Friday, September 18, 2009

मी संध्येच्या ........काठावर

काय होते सांगू तुम्हाला
जेव्हा ढळते ... जगण्यावर निष्ठा
अन मरणही वाटे परके तेव्हा...
आशेवरती..मी विणलेले
सुखावरती रेखाटलेले
जगणेच.. जेव्हा होते ......धूसर
अस्तित्वाला मिटवून टाकून
शून्य..शून्य होण्यासाठी
हळवे मनही होते....आतुर
झोकून देतो.....काळोख्या रात्री...
जगण्याची मी सगळी आस
हात पसरतो....घेतो भरून
अस्तित्वाचा अंतीम श्वास
काळ्या कभिन्न अंधारावर...रोखतो
मी माझी निर्मम नजर....तेव्हा
तेव्हा...... ती गर्भार रात्र..
का खुणाविते मला?
संकेतांनी...जीवनाच्या??
................................
................................
दिवसही नाही....रात्रही नाही
दोहोंच्याही.....
......... मी सीमेवर
मी संध्येच्या काठावर अन
सोबत माझे...
......... मन हे कातर

Saturday, September 12, 2009

कारण .... मित्रा...

एवढ्या सहजपणे निष्कर्षांवर का पोहचतो आपण्?
सत्य इतकं स्वस्त का ठरवितो आपण ?
जगाचा निवाडा करण्याची जेव्हा करतो भाषा आपण, मित्रा
तेव्हाच हरविलेली असते आपण जगावर प्रेम करण्याची क्षमता.
अन प्रेमाशिवाय माणूसच नव्हे तर जगही समजत नाही आपल्याला
स्वतःच्या क्षुद्र अहंकारापेक्षाही जग खूप मोठं आहे..... राजा
पण.....समर्पणाच्या क्षमतेशिवाय हे भान येणं खूप अवघड आहे.
म्हणून तुला सांगतो मित्रा की
अस्तित्वाच्या व्यापकतेत.... स्वतःच्या संवेदनांना
इतकं कुरवळणं बरं नव्हे.
अहंकार वेगळं करतो आपल्याला समष्टीपासून
अन आपण बसतो त्याला कुरवाळीत
स्वतःची ओळख म्हणून
तुझ्या माझ्या कल्पनेपेक्षाही खूप
निरपेक्ष असतं जीवन, दोस्त
म्हणून पूर्वग्रहांच्या द्रुष्टीने जग समजत नाही
आपणच जगण्याला पारखे होतो.
जाणीवेच्या विश्वातील हे फक्त चार क्षण आपल्या हातात आहेत, मित्रा
पण हरकत नाही! तू येईपर्यंत युगान्तापर्यंत वाट बघण्याची..
माझी तयारी आहे...कारण...
माझ्या प्रिय मित्रा....
मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो आहे