Saturday, September 26, 2009

अन मी राधा ना उरले

वृंदावनात घुमता । अजूनही बासरी धून।
जागते वक्षावरची। ती कृष्णव्रणांची खूण ॥

उद्दाम स्तनांवर रुतता । त्या कृष्णसख्याचा भार।
हृदयातून अस्फुट फुटला। तो प्रणवाचा हुंकार॥

प्रणयात जागता सूर्य। स्पर्शाने रचला पुल।
द्वैताचे भानही सुटले। मज मोरपिसाची भूल॥

प्रेमाची भरती येता। देहाचे रांजण भरले।
चंद्राचा मज सांगावा। मी दिव्यत्वाला वरले॥

तो अणुरेणूतूनि फुटता। मी माझे मीपण हरले।
तो कृष्ण कृष्ण ना उरला। अन मी राधा ना उरले॥

Friday, September 25, 2009

थेंबाशी भिडतो सूर्य.....

मातीचा पाश तळाला
पानांच्या रुतल्या रेषा
परि फुलपाखरू उडते
स्वप्नांच्या अवघड देशा

थेंबाशी भिडतो सूर्य
किरणांचे दाहक जाळे
गर्भात रूजविली त्याने
का इंद्रधनूची बाळे?

पेशींनी रचला देह
प्रेताचे प्राक्तन त्यास
मग संकेतांनी कसल्या
मजला जगण्याचा भास!

Monday, September 21, 2009

उषा राणी

सुषुप्तीच्या मानेवरती
तव हातांची
मधाळ गुंफन
अस्तित्वाच्या जागेसाठी
तव अधरांचे
प्रसन्न चुंबन!
तृप्त डवरल्या अंगाने
आऱक्त कोवळ्या रंगाने
अंधाराची सारून चादर
दिवसावरती पसरतेस तू
तू...... सूर्याची
प्रकाश घागर.

Friday, September 18, 2009

मी संध्येच्या ........काठावर

काय होते सांगू तुम्हाला
जेव्हा ढळते ... जगण्यावर निष्ठा
अन मरणही वाटे परके तेव्हा...
आशेवरती..मी विणलेले
सुखावरती रेखाटलेले
जगणेच.. जेव्हा होते ......धूसर
अस्तित्वाला मिटवून टाकून
शून्य..शून्य होण्यासाठी
हळवे मनही होते....आतुर
झोकून देतो.....काळोख्या रात्री...
जगण्याची मी सगळी आस
हात पसरतो....घेतो भरून
अस्तित्वाचा अंतीम श्वास
काळ्या कभिन्न अंधारावर...रोखतो
मी माझी निर्मम नजर....तेव्हा
तेव्हा...... ती गर्भार रात्र..
का खुणाविते मला?
संकेतांनी...जीवनाच्या??
................................
................................
दिवसही नाही....रात्रही नाही
दोहोंच्याही.....
......... मी सीमेवर
मी संध्येच्या काठावर अन
सोबत माझे...
......... मन हे कातर

Saturday, September 12, 2009

कारण .... मित्रा...

एवढ्या सहजपणे निष्कर्षांवर का पोहचतो आपण्?
सत्य इतकं स्वस्त का ठरवितो आपण ?
जगाचा निवाडा करण्याची जेव्हा करतो भाषा आपण, मित्रा
तेव्हाच हरविलेली असते आपण जगावर प्रेम करण्याची क्षमता.
अन प्रेमाशिवाय माणूसच नव्हे तर जगही समजत नाही आपल्याला
स्वतःच्या क्षुद्र अहंकारापेक्षाही जग खूप मोठं आहे..... राजा
पण.....समर्पणाच्या क्षमतेशिवाय हे भान येणं खूप अवघड आहे.
म्हणून तुला सांगतो मित्रा की
अस्तित्वाच्या व्यापकतेत.... स्वतःच्या संवेदनांना
इतकं कुरवळणं बरं नव्हे.
अहंकार वेगळं करतो आपल्याला समष्टीपासून
अन आपण बसतो त्याला कुरवाळीत
स्वतःची ओळख म्हणून
तुझ्या माझ्या कल्पनेपेक्षाही खूप
निरपेक्ष असतं जीवन, दोस्त
म्हणून पूर्वग्रहांच्या द्रुष्टीने जग समजत नाही
आपणच जगण्याला पारखे होतो.
जाणीवेच्या विश्वातील हे फक्त चार क्षण आपल्या हातात आहेत, मित्रा
पण हरकत नाही! तू येईपर्यंत युगान्तापर्यंत वाट बघण्याची..
माझी तयारी आहे...कारण...
माझ्या प्रिय मित्रा....
मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो आहे

Saturday, September 5, 2009

मेल फँक्टर

हिच्या केसांचा पिसारा, तिच्या केसाताली बटं
हिच्या गालाच्या खळीचा, तिच्या ओठावरचा तीठ
हिच्या श्वासाचा सुगंध, तिच्या ओठांचा अंगार
हिच्या मानेचा झटका , तिच्या स्तनांचा उभार
हिच्या सूरात गोडवा , तिची नजर खट्याळ
हिचे पाझरे वात्सल्य , तिचा श्रृंगार घायाळ
हिच्या मायेचा दिलासा , तिच्या प्रणयाची धग
हिच्या कुशीत विसावा , तिच्या स्पर्शातली जाग
रूप भावतसे हे ही , ओढ़ त्याही लावण्याची
हिच्या प्रेमाची निष्पाप , तिच्या धुंद तारुण्याची
किती विविध रुपांच्या , छटा मोहक सामोरी
एका फुलांत रमेना , मन माझे व्यभिचारी
दोष माझ्या नजरेचा की तुझ्या स्रुजनाचा
डाग माझ्या माथी अन का तू धनी पूजनाचा ?
चहुवार उधळले का तू सौंदर्याचे धन ?
माझ्या सीमित क्षणांना एका दिशेचे बंधन !

Wednesday, September 2, 2009

आचार्य......

(अण्वस्त्रांचे समर्थन करणार्‍या शास्त्रज्ञासाठी)
असहिष्णु धर्मांधतेचा विषारी प्रचार करणार्‍या,

स्वाभिमानशून्य, अपरिपक्व सत्ताधिशांच्या,

आक्रमक, हिंसक वृत्तीचे प्रतिक बनताहात, आचार्य तुम्ही,

ज्ञानी, समर्थ्,शस्त्रांचे अधिपती असताल तरिही...

हे शुक्राचार्य बनणे सोडा तुम्ही

लाकूड उपकारीच असतं सर्वार्थाने आचार्य,

पण तत्वांचं विखारी लखलखतं धारदार पातं

त्याला जोडलं जातं तेव्हा ते स्वतःच्याच कुळाचा,

अस्तित्वाचाच, घातही करतं

शस्त्राने सामर्थ्याचे प्रदर्शन करता येते पण

सामर्थ्य निर्माण करता येत नाही ,

दहशतीने , धाकाने युध्द टाळले जावू शकते...

पण शांतता प्रस्थापित होतेच असे नाही

युध्दाचा मार्ग संपला की द्वेषाला फुटतात दहशतीचे धुमारे

मोठ्या शस्त्रांनी गर्दीशी लढता येतं .... आचार्य

व्यक्तीशी लढता येतं नाही अन द्वेषाने......

शत्रूशी लढता येते....

पण वृत्तीशी लढता येतं नाही

अणु -विभाजनातूनच आपण सामर्थ्य निर्माण करतो आहोत..... अण्वस्त्रांप्रमाणे

अन आता सामर्थ्यातून विभाजन

मनां-मनांना एकत्र आणण्यासाठी.... सर्वाधिक ...आचार्य,

शस्त्रांची नव्हे .....

प्रेमाची गरज असते