Sunday, August 30, 2009

ग्रीष्म

ग्रीष्म तापला तापला , त्याची कोसळली आग

क्षणापूर्वीचा बहर , त्याची कोमेजली जाग

त्याने डोळ्यातली ओलं , पिली अधाशी ओठानं

आग कंठात रोवली , त्याच्या निखारी बोटानं

अंगा-अंगातले पाणी , गेले आकाशाच्या भेटी

तळ तापल्या नदीचा , आला उसासून काठी

आग पेटत्या ऋतूची , नसानसांत दाटली

फुला-फुलांत झाडाच्या , शिरं रक्ताची फाटली

असे उकले काळीज , दग्ध धरतीची काया

अंग जाळतो साजण , पुन्हा फुलवून याया

Thursday, August 27, 2009

समजूत

हो हो , तूच फक्त चिडली नाहीस
मी सुध्दा चिडलो आहे
कारण काही विचारू नकोस
मी सुध्दा चिडलो आहें
काय गुन्हा झाला एवढा ?
.म्हणून रुसवा डोंगराएवढा
चूक एखादी होते कारण
माणूस म्हणून घडलो आहे ............ मी सुध्दा चिडलो आहे
आकाशाचा संदेश घेवून पक्षी
मातीचे उड़त असतात
भेटत नाहीत कधी तरीही
आकाश धरा चिडत नसतात
अन्तर राखून जगतात कसे
कोडयाने या पिडलो आहे ............मी सुध्दा चिडलो आहे
सागरालाच ओढ़ नाही
नदी का गं म्हणत नाही
जागेवरती उसळतो म्हणून
चिडून का गं रुसत नाही
तरी धावते आवेगाने
का? या चिंतेत पडलो आहे ............मी सुध्दा चिडलो आहे
( ती हसू लागते )
हसू नकोस जीवघेणी
राग माझा पळवू नकोस
मीही चिडलोय खराखुरा
निश्चय माझा ढळवू नकोस
माहीत आहे मनाने मी
जरी तुझ्याशी जोडलो आहे .............मी सुध्दा चिडलो आहे
( आता अबोला असह्य होतोय म्हणून हा तहाचा युक्तीवाद )
पण आकाशाच्या निखा-याने
फुले सुध्दा फुलतात की
मौनामध्ये अंधाराच्या
शब्दचान्दन्या खुलतात की
झाडामध्ये अडला वारा
सूर बनून सरकत आहे
चिडलो आपण दोघे तरीही
बोलायला काय हरकत आहे?

Wednesday, August 26, 2009

मना-मनाचे कोमल नाते, आपुलकीचे प्रेमळ बंध

स्नेहावाचून कसा मिळावा , जगण्यातील निर्मळ सुगंध

जगण्याचे सामर्थ्य मिळवूया

जीवन सुंदर चला घडवूया

अपेक्षांचे अवघड ओझे, नात्यांचे चैतन्य चोरते,

स्वार्थापुरते जगणे निर्मम , दू:खाचे प्रारब्ध कोरते

अधिकाराच्या भाषेवाचून , प्रेमाचा संवाद घडवूया

जीवन सुंदर चला घडवूया

पवित्रतेचे चिंतन सुंदर, धडा दाखवू वागणुकीचा

आणी जपूया एक तेवता, दिवा अंतरी माणुसकीचा

परस्परांच्या विश्वासाने , व्यवहाराची वाट चालूया

जीवन सुंदर चला घडवूया

स्वतंत्र आपण, समर्थ आपण , ठाम खूण ही मनांत बांधू

आप-परान्तील विश्वासाचा, पूल मनामनांतून सांधू

जगण्यावरच्या भक्तीमधूनी , शक्ती मिळवू या

जीवन सुंदर चला घडवूया

जीवन मिळते , जसे चिन्तीतो , विचार घडवे सृष्टी

नव्या जगाला, चला पाहूया , जरा बदलूनी दृष्टी

चैतन्याला मुक्त करूनिया , उधळून देवूया

जीवन सुंदर चला घडवूया

भीती कसली पराभवाची , सोडू जगणे उदासवाणे

चला उठूया आनंदाने , गावून टाकू जीवनगाणे

हात - मनाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवूया

जीवन सुंदर चला घडवूया

Monday, August 24, 2009

अहंकार

वादळवा-यात ऊन -पावसात उभं होतं, एक झाड़
सोसाट्याच्या वा-यानेही झुकलं नाही
प्रवाहाच्या रेटयानेही तुटलं नाही
सामर्थ्याचा अंहकार, झाडामध्ये मावेना
आत्मस्तुती करताना, वाणी त्याची थकेना
मीच श्रेष्ठ, मीच शक्तीवान, मला कुणाची गरज नाही
सामर्थ्याचा मीच निर्माता, मदत कुणाची खरचं नाही
कुणी म्हणालं ,
पानामधून प्रकाश घेतोस , अन्न करतोस , त्याने सामर्थ्य येते
झाडाला पटेना, त्याने प्रकाश नाकारला
कुणी म्हणाले ,
पाण्याने तुझ्या नसानसांत जीवनरस पोहचवला, त्याने ताकद आली
झाडाला रुचेना , त्याने पाणी नाकारले
कुणी म्हणालं ,
मुळात तुझ्या ताकद खरी! पण, त्याला जमिनीचा आधार!!
झाड़ ताठरलं, अहंकाराने मातीशीही नातं नाकारलं
अन् त्या क्षणी ..........................
ते झाड़ ,
कुठल्याही वादळाशिवाय ,
प्रवाहाच्या रेट्याशिवाय,
सोसाट्याच्या वा-याशिवाय
अचानक...........
उन्मळून
पडलं

Sunday, August 23, 2009

कधी जणू

ही कशी वासना , रतीमदनाचा खेळ

प्रेमात घातला , कसा जडाचा मेळ

ही उत्कट भिड़ते , दोन जडांची काया

चैतन्य उधळते , बेभान करितसे माया

हे प्रेम कधी जणू , आर्त मनाची वीण

अन् कधी वासना , काया व्याकुळ दीन

मतदार राजा

काळोख घेवून उरामध्ये असा का तू जगतो आहेस ?

चिता तुझ्याच सन्मानाची का मूढपणे बघतो आहेस ?

गजसहस्त्राचे बळ परी बाहू का रे जडावले ?

विश्वप्रकाशी चैतन्य तुझे असे का रे थंडावले ?

लाचारीने जगणे राजा सोड वागणे हे षन्ढाचे !

घेवूनी मशाल उचल रे शिंग फूंक तू बंडाचे !!

Saturday, August 22, 2009

खळबळ

वावटळ झेललेल्या पानसळीला अजून पंख वा-याने झंकारू नकोस

दोन घटका येवून उडून जातोस पाखरा , अचानक

कधी जाणलयं ........... या झाडाचं एकाकीपण

तुझ्या येण्याच्या आनंदापेक्षा जाण्याची हुरहुरच

जास्त लागते मनाला

अरे, वास्तवाच्या जमीनीला मूळं बांधली आहेत म्हणून

नाही येता येत उडून तुझ्याबरोबर

पण तरीही मी शांत आहे कारण

मला माहितेयं , की उडालास आकाशात चार क्षण

तरी तुझं हक्काचं , निवा-याचं ठिकाण मीच आहे

पण हे दुराव्याचं नातं नाही रे सहन होत

तुला मला सांधणा-या या अप्रतीघाताची अमूर्तता ,

लक्ष लक्ष भाल्याची टोके बनून , विदीर्ण करते मनाला

अवघडं होतं रे , एवढं सारं सहन करून

पुन्हा स्थितप्रज्ञासारखं उभं राहाणं

टाळूनही मग ही खळबळ व्यक्त होते

इतरांना वाटते की , ही पानांची सळसळ आहे