Saturday, September 5, 2009
मेल फँक्टर
हिच्या गालाच्या खळीचा, तिच्या ओठावरचा तीठ
हिच्या श्वासाचा सुगंध, तिच्या ओठांचा अंगार
हिच्या मानेचा झटका , तिच्या स्तनांचा उभार
हिच्या सूरात गोडवा , तिची नजर खट्याळ
हिचे पाझरे वात्सल्य , तिचा श्रृंगार घायाळ
हिच्या मायेचा दिलासा , तिच्या प्रणयाची धग
हिच्या कुशीत विसावा , तिच्या स्पर्शातली जाग
रूप भावतसे हे ही , ओढ़ त्याही लावण्याची
हिच्या प्रेमाची निष्पाप , तिच्या धुंद तारुण्याची
किती विविध रुपांच्या , छटा मोहक सामोरी
एका फुलांत रमेना , मन माझे व्यभिचारी
दोष माझ्या नजरेचा की तुझ्या स्रुजनाचा
डाग माझ्या माथी अन का तू धनी पूजनाचा ?
चहुवार उधळले का तू सौंदर्याचे धन ?
माझ्या सीमित क्षणांना एका दिशेचे बंधन !
Wednesday, September 2, 2009
आचार्य......
(अण्वस्त्रांचे समर्थन करणार्या शास्त्रज्ञासाठी)
असहिष्णु धर्मांधतेचा विषारी प्रचार करणार्या,
स्वाभिमानशून्य, अपरिपक्व सत्ताधिशांच्या,
आक्रमक, हिंसक वृत्तीचे प्रतिक बनताहात, आचार्य तुम्ही,
ज्ञानी, समर्थ्,शस्त्रांचे अधिपती असताल तरिही...
हे शुक्राचार्य बनणे सोडा तुम्ही
लाकूड उपकारीच असतं सर्वार्थाने आचार्य,
पण तत्वांचं विखारी लखलखतं धारदार पातं
त्याला जोडलं जातं तेव्हा ते स्वतःच्याच कुळाचा,
अस्तित्वाचाच, घातही करतं
शस्त्राने सामर्थ्याचे प्रदर्शन करता येते पण
सामर्थ्य निर्माण करता येत नाही ,
दहशतीने , धाकाने युध्द टाळले जावू शकते...
पण शांतता प्रस्थापित होतेच असे नाही
युध्दाचा मार्ग संपला की द्वेषाला फुटतात दहशतीचे धुमारे
मोठ्या शस्त्रांनी गर्दीशी लढता येतं .... आचार्य
व्यक्तीशी लढता येतं नाही अन द्वेषाने......
शत्रूशी लढता येते....
पण वृत्तीशी लढता येतं नाही
अणु -विभाजनातूनच आपण सामर्थ्य निर्माण करतो आहोत..... अण्वस्त्रांप्रमाणे
अन आता सामर्थ्यातून विभाजन
मनां-मनांना एकत्र आणण्यासाठी.... सर्वाधिक ...आचार्य,
शस्त्रांची नव्हे .....
प्रेमाची गरज असते
Sunday, August 30, 2009
ग्रीष्म
ग्रीष्म तापला तापला , त्याची कोसळली आग
क्षणापूर्वीचा बहर , त्याची कोमेजली जाग
त्याने डोळ्यातली ओलं , पिली अधाशी ओठानं
आग कंठात रोवली , त्याच्या निखारी बोटानं
अंगा-अंगातले पाणी , गेले आकाशाच्या भेटी
तळ तापल्या नदीचा , आला उसासून काठी
आग पेटत्या ऋतूची , नसानसांत दाटली
फुला-फुलांत झाडाच्या , शिरं रक्ताची फाटली
असे उकले काळीज , दग्ध धरतीची काया
अंग जाळतो साजण , पुन्हा फुलवून याया
Thursday, August 27, 2009
समजूत
मी सुध्दा चिडलो आहे
कारण काही विचारू नकोस
मी सुध्दा चिडलो आहें
काय गुन्हा झाला एवढा ?
.म्हणून रुसवा डोंगराएवढा
चूक एखादी होते कारण
माणूस म्हणून घडलो आहे ............ मी सुध्दा चिडलो आहे
आकाशाचा संदेश घेवून पक्षी
मातीचे उड़त असतात
भेटत नाहीत कधी तरीही
आकाश धरा चिडत नसतात
अन्तर राखून जगतात कसे
कोडयाने या पिडलो आहे ............मी सुध्दा चिडलो आहे
सागरालाच ओढ़ नाही
नदी का गं म्हणत नाही
जागेवरती उसळतो म्हणून
चिडून का गं रुसत नाही
तरी धावते आवेगाने
का? या चिंतेत पडलो आहे ............मी सुध्दा चिडलो आहे
( ती हसू लागते )
हसू नकोस जीवघेणी
राग माझा पळवू नकोस
मीही चिडलोय खराखुरा
निश्चय माझा ढळवू नकोस
माहीत आहे मनाने मी
जरी तुझ्याशी जोडलो आहे .............मी सुध्दा चिडलो आहे
( आता अबोला असह्य होतोय म्हणून हा तहाचा युक्तीवाद )
पण आकाशाच्या निखा-याने
फुले सुध्दा फुलतात की
मौनामध्ये अंधाराच्या
शब्दचान्दन्या खुलतात की
झाडामध्ये अडला वारा
सूर बनून सरकत आहे
चिडलो आपण दोघे तरीही
बोलायला काय हरकत आहे?
Wednesday, August 26, 2009
मना-मनाचे कोमल नाते, आपुलकीचे प्रेमळ बंध
स्नेहावाचून कसा मिळावा , जगण्यातील निर्मळ सुगंध
जगण्याचे सामर्थ्य मिळवूया
जीवन सुंदर चला घडवूया
अपेक्षांचे अवघड ओझे, नात्यांचे चैतन्य चोरते,
स्वार्थापुरते जगणे निर्मम , दू:खाचे प्रारब्ध कोरते
अधिकाराच्या भाषेवाचून , प्रेमाचा संवाद घडवूया
जीवन सुंदर चला घडवूया
पवित्रतेचे चिंतन सुंदर, धडा दाखवू वागणुकीचा
आणी जपूया एक तेवता, दिवा अंतरी माणुसकीचा
परस्परांच्या विश्वासाने , व्यवहाराची वाट चालूया
जीवन सुंदर चला घडवूया
स्वतंत्र आपण, समर्थ आपण , ठाम खूण ही मनांत बांधू
आप-परान्तील विश्वासाचा, पूल मनामनांतून सांधू
जगण्यावरच्या भक्तीमधूनी , शक्ती मिळवू या
जीवन सुंदर चला घडवूया
जीवन मिळते , जसे चिन्तीतो , विचार घडवे सृष्टी
नव्या जगाला, चला पाहूया , जरा बदलूनी दृष्टी
चैतन्याला मुक्त करूनिया , उधळून देवूया
जीवन सुंदर चला घडवूया
भीती कसली पराभवाची , सोडू जगणे उदासवाणे
चला उठूया आनंदाने , गावून टाकू जीवनगाणे
हात - मनाच्या सामर्थ्याचे दर्शन घडवूया
जीवन सुंदर चला घडवूया