नको झाले देवा दू:खाचे जगणे
आयुष्याची गोडी पुरे झाली
जीवनाचे नाते मनाशीच तुटे
आता सोसवेना नको वाटे
वाहतो मी देवा न उमलत्या कळ्या
दुःखार्त या जीवा तसे वाहावे वाटे
दुःखार्त आक्रोष डोळी शोकधारा
मिटुनिया नेत्र आकांत केला
थकलो थकलो जीवनाशी झगडलो
पण नाही अंत झाला यातनांचा
उपयोग व्हावा हीच मनी आस
पण स्वार्थाने केवळ मज वापरले
प्रहर आकांत निर्गत वेदना
शांत भावनेने उघडले डोळे
पाहतो फुलल्या न उमलत्या कळ्या
जीवनाचा गंध त्यांनी विखुरला
माझिया मनांस देवाचा संकेत
बघ त्यांचे जगणे मरणांत
फुलल्यावाचून कळी न सोडे प्राण
जगण्यावाचून व्यर्थ ते मरण
तुझ्यासाठी तुझे मरण संपले
आता फक्त श्वास फुलण्यास
तुझ्या जीवनाचा उधळी सुगंध
फुलणे आनंद आत्मरंगी