Monday, August 17, 2009

ऋणाचे फिटेना ऋण

जगण्यात कुणाच्या मिळतो
आधार कुणा निष्फळ
मरणात कुणाच्या मिळते
जगण्यास कुणाला बळ
असण्यात पार्थिवाच्या मिळतो
आत्म्यास जडाचा डंखं
नसण्यात नभाच्या मिळती
स्वप्नास नवे ते पंखं
भावांत कुणाच्या पड़ती
मन मुक्ततेस बंध
न् रिक्ततेत स्फुरती
आनंदी मुक्त छंद
सुखात वासना फूलती
पेटती अनंग ज्वाळा
du:khaat वासना नुरती
मनी दाटतो उमाळा
धनांत अहंता भ्रूण
मीपणी मृत्यूचा शाप
ऋणाचे फिटेना ऋण
निर्भयी वेदना लोप

Sunday, August 16, 2009

शिवाचा वास

प्रतारणा तुझ्याशी नाही करत म्हणून
मी एकनिष्ठ नाही ठरत
वासनेच्या बाणावरती केव्हाच छिन्न झाल्यात
आमच्या रामनिष्ठा
अगं , जानीवेचा ,
अनुभूतीचा स्पर्श
या निर्विकार मनाला
ज्या भाषेतून होतो ना
तीच बनते त्याची परिभाषा
प्रेमाचा अर्थ प्रथम शरीराला कळला
मग मनाला
कशी पाळावी आम्ही एकनिष्ठा
आता वासनेच्या शब्दांशिवाय
नाही घडत मनाशी संवाद
पण तुझं प्रेम , तुझं समर्पण
माझं मीपण त्याने बदलवून टाकलयं
जिथे मनाचाच भ्रमर होतो ना प्रिये
तिथे व्यभिचार हाही स्वभाव बनतो
आताही असतं आकर्षण
अन्य फुलांचं तरीही
तुझी कमळमिठी सोडवत नाही
एकनिष्ठता नाही माझा स्वभाव तरीही
तुझ्याशी प्रतारणा आहे आता
शक्यतेच्या कोटीतील
अशक्य बाब माझ्यासाठी
अगं विकाराच्या छातीमध्ये
एवढाच विशुध्द श्वास आहे
खजुराहोच्या गाभा-यातील
हाच शिवाचा वास आहे

Sunday, August 9, 2009

दुर्दम्य

ग्रीष्माचं रणरणतं ऊन, ओसाड माळरान
निष्पर्ण वृक्ष अन् जळलेले पान न् पान
एक सुर्यमौळी झोपडी त्यात तगलेली
मिळेल ते काम कष्टाचं करीत जग़लेली
भूकेलीही राहते झोपडी आधी मधी
पण श्रृंगार देहाचा चुकत नाही कधी
थकलेल्या देहातून पाझरणारी आसक्ती
दुर्दम्य इच्छेने त्यातूनही वाहणारी जीवनशक्ती
करपलेल्या गात्रांचा क्षणभराचा विसावा
जीवनाला त्यातही अंकुर दिसावा
पेटते उन भाजनारी धग सोसते आहे
नऊ महीने जीवन तिथे फुलते आहे
नाभीने प्राणायाम करणारा एक हठयोगी
जलाशयात समाधी लावून बसलेला जीवनभोगी
आत्मक्लेशाची परिसीमा गाठणारा जीवनसाधक
भीती कसली त्याला ग्रीष्मरणाची दाहक
बीज न बीज करपलेले तरी
हठयोग्याची जीवनेच्छा सरत नाही
स्रुजनाची बधीर करणारी वेदना सोसूनही
दुःख काही उरत नाही



Saturday, August 8, 2009

सवाल बापपिढीला

काय दिलतं आम्हाला तुम्ही?
निरोधातच अडकविलात तुम्ही तुमच्या सृजनशील वीर्याचा थेंब
आवेगाच्या अन् उत्साहाच्या प्रत्येक क्षणाला बहाल केलतं हे वांझोटेपणाचं दान
तुम्हीच तुमच्या अस्तित्त्वाचं कोडं तुम्हालाच सुटलं नाही तरीही
त्या मोहग्रस्त जगण्याचं दुःख चिटकवलतं आमच्या कपाळी
अन् तारुण्याच्या उन्मादातील अनावर वासनेत
वर्षानुवर्षे वीर्य झिजल्यावर थकलेल्या देहानं आणि मनानं
म्हातारपणची काठी म्हणून जन्माला घातलत आम्हाला
काय दिलतं आम्हाला तुम्ही ?
स्वाभिमानाचं पागोटे सोडून उभे राहिलात लाचारीने परकीयांच्या दाराशी
अन् वैश्विकतेच्या गप्पा मारत संस्कृतीचं लाजेचं शेवटचं वस्त्रही
टाकलत काढून आपल्याच पायाशी
काय अनुभवलयं स्वातंत्र्य तुम्ही ?
मुक्ततेचा सम्बन्ध असा नग्नतेशी लावलात
अन् पायावर उभे राहण्याचा लाचारीशी
निरर्गल वासना अन् उपभोगाच्या अश्वासाठी दूर सारलीत
संस्कृतीची कामधेनु तुम्ही
अन् वाढत्या मजल्यांच्या संस्कुतीकडे पाहात लाथाडल्या
समाधानाच्या पर्णकुटी तुम्ही
व विसरलात तेव्हा की
कुठल्याच मजल्याला स्वत:ची जमीन नसते म्हणून
स्वत:ला घेत राहीलात नेहमी दुस-याकडूनच इंधन
अन् विसरलात तेव्हाही की
ज्या प्रकाशाचं इंधन त्याच्या पोटातच असतं ना
तो विझत नाही कधीही
असच परावलम्बी अन् निरुद्देशी आयुष्य जगलात जन्मभर
अन् आता स्वानंदाच्या हस्तमैथूनाने थकलेल्या तुमच्या हातामध्ये
त्राणही नाही आमच्या फड्फडणा-या ज्योतीभोवती
ओंजळही धरण्याचं
पण इथून पुढं तुमच्या कर्माचं फळ म्हणून
तुमच्या पराभवाचा डाग मिरवीत जगणार नाही आम्ही
जन्माला येणं नसलं आमच्या हातात तरीही
तुमच्या चुकाच्या सजा भोगण्याऐवजी फुलवू जगवू
आमचं अस्तित्त्व आम्ही
स्वयम्भू बनून
कारण जगणं आणि मरणं अजूनही
आमच्या हातात आहे
अन् हेही लक्षात ठेवा अजूनही की
आमचं आयुष्य असली तुमची निर्मिती तरीही
पुनरावृत्ती नक्की नाही
पुनरावृत्ती नक्की नाही

Friday, August 7, 2009

महात्म्याची खंत

दुस-याच्या दुःखाने माझे डोळे पाणावतात
तर ते मला 'करुणाशील' म्हणतात
भोवताली दू;ख दैन्य बघून मला माझ्या सुखाचे ओझेहोते
म्हणून मी ते नाकारतो
तर ते मला 'त्यागी' म्हणतात
असहाय्यांसाठी मी मदतीचा हात पुढे करतो
तर ते मला 'दानशूर' ठरवितात
चुका करून माझ्या मुलांनी बिघडू नये म्हणून
मी त्यांना शिक्षा करतो
तर ते मला 'न्यायी' म्हणतात
आनंद वाटल्याने वाढतो म्हणून मी तो उधळतो
तर ते मला 'प्रेमळ' म्हणतात
सहजपणे, जमेल तेवढीच मी इतरांना मदत करतो
तर ते माझ्या माणुसकीचं गुणगान करतात
काहीही खर्च न करता माझं सुखही न गमावता
मी हे सहजपणे करतो असे मी म्हणताच
स्वत:ची मानूस म्हणून जात राखण्यासाठी
ते मला "महामानव" ठरवितात

Tuesday, August 4, 2009

जन्म चांदण्यांचा

अवकाशाच्या अंगणामध्ये

चांदण्याही नव्हत्या तेव्हा

एक लाजरा प्रियकर होता

वर्णरुपेरी सौम्य तनुचा

कोमल हृदयी मधुर गातसे

गीत प्रियेचे गुंजन करुनी

आरसपानी सौन्दर्यखणी ती

एक यौवना नीलतनुची, नीलधराती

नीलधराती, तिच्याच प्रितीचा पुजारी

शशीकर भोळा फसला होता

समजूनी जणू ती

गुंगूनी फिरते अपुल्याभोवती

परी एकदा गुपित कळाले

नीलधरेच्या धुंद मदाचे

तिचा प्रियकर कुणी रविकर

रसरसणा-या तेज तनुचा

चंद्र बिचारा

न कळले त्याला

तारुण्याच्या तप्त तनुला

ओढ़ भिडण्या दाहकतेची

शीतलता न च त्यास उतारा

म्हणूनी पाहुनी श्रृंगार तयांचा

शशिकराचे शशह्रदय हे तिथे

विखुरले कणाकणाने

अजूनही दिवसा तेज रवीशी

प्रणयाने मग क्लांत होवूनी

निजते जेव्हा तुष्ट धरा ती

पाहूनी तिजला शश हृदयाचे

विदीर्ण कण ते

आर्त व्यथेने गलबलती

जन म्हणती चांदण्या लुकलुकती

जन म्हणती चांदण्या लुकलुकती

Saturday, August 1, 2009

असेही एक जगणे

असेही एक जीवन मला स्मरते आहे
सर्वस्व अर्पूनही जिथे मीपण उरते आहे
असेही एक जगणे मला समोर दिसते आहे
बेफाम आयुष्याच्या अखेरीला जिथे रितेपण घुसते आहे
असेही एक जगणे अजूनही मी पाहतो आहे
ज्याचा कण न कण अतृप्तीचा भूतकाळ वाहतो आहे
असेही एक जगणे मला समोर कळते आहे
उत्कटतेच्या सरणावरती कणाकणाने
जिथे जीवन जळते आहे