अवकाशाच्या अंगणामध्ये
चांदण्याही नव्हत्या तेव्हा
एक लाजरा प्रियकर होता
वर्णरुपेरी सौम्य तनुचा
कोमल हृदयी मधुर गातसे
गीत प्रियेचे गुंजन करुनी
आरसपानी सौन्दर्यखणी ती
एक यौवना नीलतनुची, नीलधराती
नीलधराती, तिच्याच प्रितीचा पुजारी
शशीकर भोळा फसला होता
समजूनी जणू ती
गुंगूनी फिरते अपुल्याभोवती
परी एकदा गुपित कळाले
नीलधरेच्या धुंद मदाचे
तिचा प्रियकर कुणी रविकर
रसरसणा-या तेज तनुचा
चंद्र बिचारा
न कळले त्याला
तारुण्याच्या तप्त तनुला
ओढ़ भिडण्या दाहकतेची
शीतलता न च त्यास उतारा
म्हणूनी पाहुनी श्रृंगार तयांचा
शशिकराचे शशह्रदय हे तिथे
विखुरले कणाकणाने
अजूनही दिवसा तेज रवीशी
प्रणयाने मग क्लांत होवूनी
निजते जेव्हा तुष्ट धरा ती
पाहूनी तिजला शश हृदयाचे
विदीर्ण कण ते
आर्त व्यथेने गलबलती
जन म्हणती चांदण्या लुकलुकती
जन म्हणती चांदण्या लुकलुकती
No comments:
Post a Comment