उपेक्षेसाठी नाही माझं बाळ
स्रुजनाच्या नविन जग घडविण्याच्या
इच्छेतून प्रगटला आहे त्याचा जन्म
ठरणार आहे चुकलेल्या दिशांची तो नवी वाट
अन् अंधारलेल्या भयकारी जगण्याची आशादायी पहाट
तो नाही फक्त हाडामांसाचा देह किंवा
आपल्याच भौतिक अस्तित्वाला चिकटलेला मोह
तो आहे संवेदनेची एक अनावर शक्ती अन्
जगण्यावर, अस्तित्वावर असलेली उत्कट भक्ती
तो नसेल आत्मरत वासनांचा कल्लोळ अन्
अतृप्त विषयाग्नीचा वखवखता लोळ
तो असेल निर्मोही आनंदी जगणे
प्रेम संवेदनांचे निर्वैर बरसणे
तो असेल आधार , असहाय्यतेचा
तो ठरेन दिलासा आशेचा
तो असेल वेदनेसाठी मायेचा स्पर्श अन्
फुलवेन कोमेजल्या मनांतून हर्ष
शापित अशा जगण्यावर, तो एक ईश्वराचा वर अन्
कृष्ण बासरीचा एक सनातन मोहन स्वर
No comments:
Post a Comment