प्रतारणा तुझ्याशी नाही करत म्हणून
मी एकनिष्ठ नाही ठरत
वासनेच्या बाणावरती केव्हाच छिन्न झाल्यात
आमच्या रामनिष्ठा
अगं , जानीवेचा ,
अनुभूतीचा स्पर्श
या निर्विकार मनाला
ज्या भाषेतून होतो ना
तीच बनते त्याची परिभाषा
प्रेमाचा अर्थ प्रथम शरीराला कळला
मग मनाला
कशी पाळावी आम्ही एकनिष्ठा
आता वासनेच्या शब्दांशिवाय
नाही घडत मनाशी संवाद
पण तुझं प्रेम , तुझं समर्पण
माझं मीपण त्याने बदलवून टाकलयं
जिथे मनाचाच भ्रमर होतो ना प्रिये
तिथे व्यभिचार हाही स्वभाव बनतो
आताही असतं आकर्षण
अन्य फुलांचं तरीही
तुझी कमळमिठी सोडवत नाही
एकनिष्ठता नाही माझा स्वभाव तरीही
तुझ्याशी प्रतारणा आहे आता
शक्यतेच्या कोटीतील
अशक्य बाब माझ्यासाठी
अगं विकाराच्या छातीमध्ये
एवढाच विशुध्द श्वास आहे
खजुराहोच्या गाभा-यातील
हाच शिवाचा वास आहे
1 comment:
Chhan!! Uttam!!!
Shabdancha Yogya vapar karun achukpanne bhavnaa pochavlyat.
Post a Comment