Saturday, August 22, 2009

खळबळ

वावटळ झेललेल्या पानसळीला अजून पंख वा-याने झंकारू नकोस

दोन घटका येवून उडून जातोस पाखरा , अचानक

कधी जाणलयं ........... या झाडाचं एकाकीपण

तुझ्या येण्याच्या आनंदापेक्षा जाण्याची हुरहुरच

जास्त लागते मनाला

अरे, वास्तवाच्या जमीनीला मूळं बांधली आहेत म्हणून

नाही येता येत उडून तुझ्याबरोबर

पण तरीही मी शांत आहे कारण

मला माहितेयं , की उडालास आकाशात चार क्षण

तरी तुझं हक्काचं , निवा-याचं ठिकाण मीच आहे

पण हे दुराव्याचं नातं नाही रे सहन होत

तुला मला सांधणा-या या अप्रतीघाताची अमूर्तता ,

लक्ष लक्ष भाल्याची टोके बनून , विदीर्ण करते मनाला

अवघडं होतं रे , एवढं सारं सहन करून

पुन्हा स्थितप्रज्ञासारखं उभं राहाणं

टाळूनही मग ही खळबळ व्यक्त होते

इतरांना वाटते की , ही पानांची सळसळ आहे

वास्तव

बीजं

उदात्त प्रेमाचं असो वा

रानटी बेभान वासनेचं

नवजन्मासाठी समर्पीत केलेलं असो वा

अनावर उन्मादात ओतलेलं

फळतं ,तेव्हा

इच्छा अनिच्छेच्या संदर्भाशिवाय

वाढते एक जाणीव

तिचे स्वतंत्र अस्तित्व घेवून

त्या जगण्याचा सम्भव

फक्त .....................

बीजाच्या मिलनात असतो

Friday, August 21, 2009

नातं

अविरत वारा मनामधुनी संक्रामितसे मला पुढे
अखंड गतीचा जरी वारसा तरी दिशेचे कोडे पड़े
सरसर शिरवा गारसरीचा पाऊस हळूच भिरभिरतो
अन् मेघाचा कळप हाकूनी वारा अंगातूनी शिरतो
या वा-याची दिशा कोणती? या मेघांचा मार्ग कसा?
कुणी ठरविले म्हणूनी चालती, घेवुनी ते हां नित्य वसा
प्रश्न मनीचा आवर्तुनी मग पुन्हा मनातच फेर धरे
अनामिक टी जाणीव होता हळूच काया थरथरते
या वा-यातूनी या मेघांतूनी सूत्र एकची जे प्रगटे
मर्त्य मनु मी, या स्रृष्टीचा, त्या सूत्राचा भाग असे
अद्वैताचा भाव आकळे, मार्ग जरी हा जुन्या धुळीचा
समाधान हे मला तेवढे , मी वा-याच्या जातकुळीचा

कुमारी माता

अनाचार नाव ज्याला, त्याला आवरू मी कसे
क्षण धुंद आवेगाचा, त्याला पापी म्हणू कसे
त्या क्षणांना ना नाते, ना अस्तित्वाची जाणं
बंद कळीने झेललं, दवातलं प्रीतीगाणं
तुझं वळीवाचं देणं, रुजे तापल्या कुशीत
नवजन्माचा आनंद, दाटे ग्रीष्माच्या मुशीत
आता नाही मला क्षिति, जगदोषांची जराही
रुजलेली प्रीत वेडी घेई सृजन भरारी

पहिली रात्र

लग्नरात्री एकटीला खोलीत सोडलं मला
थरथर माझ्या काळजाची कशी सांगू तुला
घाम फुटला सर्वांगाला हलकेच आले पाशी
हनुवटीला हात लावला जणू मऊ उशी
म्हणले ज़रा बोला की ठेवा आमचा मान
ओठ माझे हलले तर केला ओठांचा कान
लाजून झाले चूरचूर भीती पळली कोठे
शब्दसकट टिपले ओठ मोहर अंगी फूटे
पुढच्या सा-या संवादाला फक्त सुरांची भाषा
शब्दामध्ये विचारू नकोस चावट तुझी आशा
तुला सांगते धन्याचा स्वभाव माझा खरा
सुर्याच्याही पोटात म्हणे असतो एक झरा

Thursday, August 20, 2009

उत्तर

बाधा, समस्या , अडचणी , संषर्ष अगणित असतीलही
पण एक सत्य हे सुध्दा आहे की आपण नसतो कधीच
भाग या परिस्थितीचा
संस्कार , नाते , अपेक्षा , भावना गुंतवितात तरीही
एक सत्य हे सुध्दा आहे की आपण नसतो कधीच
भाग या बंधनांचा
हे सुध्दा आजचे सत्यच आहे मित्र की,
जन्माला आलो आहोत कधीच तरीही
अजून आपले जगणे सुरु नाही
देहव्यापार सुरु असूनही
अजून जीवन सुरु नाही
कारण,
स्वातंत्र्याचा बोध होतो
तिथून जीवन सुरु होते
सामर्थ्याचा बोध होतो
तिथून जगणे सुरु होते
आपण स्वतंत्र आहोत
समर्थ आहोत जन्मत:च
प्रश्न नंतर येऊन चिकटतात आपल्याला
आणि मग आपणचं त्या प्रश्नाचा भाग बनून राहतो
जीवन हे काही प्रश्नचिन्ह नव्हे मित्र,
अहंकाराला , अस्तित्वाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नासाठी
जीवन हे एक उत्तर आहे

Wednesday, August 19, 2009

माझं बाळ

उपेक्षेसाठी नाही माझं बाळ
स्रुजनाच्या नविन जग घडविण्याच्या
इच्छेतून प्रगटला आहे त्याचा जन्म
ठरणार आहे चुकलेल्या दिशांची तो नवी वाट
अन् अंधारलेल्या भयकारी जगण्याची आशादायी पहाट
तो नाही फक्त हाडामांसाचा देह किंवा
आपल्याच भौतिक अस्तित्वाला चिकटलेला मोह
तो आहे संवेदनेची एक अनावर शक्ती अन्
जगण्यावर, अस्तित्वावर असलेली उत्कट भक्ती
तो नसेल आत्मरत वासनांचा कल्लोळ अन्
अतृप्त विषयाग्नीचा वखवखता लोळ
तो असेल निर्मोही आनंदी जगणे
प्रेम संवेदनांचे निर्वैर बरसणे
तो असेल आधार , असहाय्यतेचा
तो ठरेन दिलासा आशेचा
तो असेल वेदनेसाठी मायेचा स्पर्श अन्
फुलवेन कोमेजल्या मनांतून हर्ष
शापित अशा जगण्यावर, तो एक ईश्वराचा वर अन्
कृष्ण बासरीचा एक सनातन मोहन स्वर