Monday, January 11, 2010

अलविदा मि. गांधी.....अलविदा

हेलो मि.गांधी,
ओळखलंत मला?
कसं शक्य आहे!?
आपल्याच मृत्यूला ओळखण्याचे भाग्य फार थोडया जणांना लाभतं.
पण तुमच्या डोळयात हे काय तरळतयं मि. गांधी?
भीती!!?
नाही,नाही,
प्रश्नचिन्ह ? कशाबद्दल ??
ओहो ! कमाल आहे तुमची मि.गांधी!!
मरतानाही वकीलपण जात नाही तुमचं.
हो, पण असू दे.
मलाही तुम्हाला ते सांगायलाच हवं.....कारण
असेच प्रश्न घेवून गेलात निरुत्तर तर...
एखादं पिशाच्च बनून पुन्हा याल
आणि बसाल पुन्हा इथल्या
हळव्या मनांच्या मानगुटीवर.
जीवनाचं रांगडं वास्तव पचवू न शकणारी, ही भित्री मने,
पुन्हा करतील तुमचाच जयजयकार!
नो नो नो मि. गांधी....
हे सगळं आता थांबवायलाच हवं....त्यासाठीच...
त्यासाठीच..तुमच्या डोळ्यातील ही प्रश्नचिन्हे मावळायला हवीत...कारण
कारण काय आहे मि. गांधी, तुमच्या त्या प्रश्नचिन्हांमध्ये विष आहे
मानवी मनाला जखडणारं.
म्हणून मि. गांधी तुम्हाला गेलचं पाहिजे.... नि:शंक!
करुणेच्या , प्रेमाच्या धाग्यातून ,
कसला प्रयत्न करताय गांधी तुम्ही....
व्यवस्था निर्माण करण्याचा?
आणि ही करुणेची महतीही तुम्ही सांगताय कुणाला?आम्हाला??
अहो, इथून तर बुध्दही हद्दपार केलाय आम्ही!
व्यवस्था कधीही करुणेतून निर्माण होत नाही....सत्तेतून होते
तुम्हाला हे सत्य कधीच कळले नाही मि. गांधी.
या केवढ्या मोठ्या असत्यावर प्रयोग चालू होता तुमचा!
मि. गांधी हाच होता तुमचा खरा गुन्हा!!
आणखी एक मि. गांधी, हे तुम्हीच म्हणायचा ना की
जग बदलण्याचा प्रयत्न करू नका म्हणून...
आणि तुम्हीच करत राहीलात प्रयत्न....छाती फुटेस्तोवर
काय तर म्हणे....एका वर्षात स्वराज्य आणि
एका जन्मात रामरा़ज्य स्थापन करण्यासाठी!!
पण तुमच्या या अशक्य स्वप्नांना,
आम्ही भुललो नाही मि. गांधी.
पुरतं जोखलं आहे तुम्हाला आम्ही.
आत्मबलावर आधारीत श्रेष्ठ समाजाच्या निर्मितीची
स्वप्न बघणारे तुम्ही...
तुम्ही तर आमच्याच जीवावर उठलात!
वंशश्रेष्ठत्वाचा, वर्णश्रेष्ठत्वाचा, अस्तित्वाचा अहंकार
हाच तर आमच्या जीवनाचा आधार!!
तो आधारच काढून घेण्याचा तुमचा कावेबाजपणा
वेळीच ओळखला आम्ही मि. गांधी
आणि अस्तित्वाचाच प्रश्न आल्यावर
डार्विन काय सांगून गेला ठाऊक आहे ना तुम्हाला
"Survival of the fittest!!!"
मग तुम्हीच ओळखा मि. गांधी
तुमच्या सारख्या दुबळ्या शरीराच्या जर्जर म्हातार्‍याने
जगायचं की आम्ही?
म्हणून तुमचा मृत्यू हा काही अधर्म वा खून नाही मि. गांधी
निसर्गाच्या नियमाप्रमाणे आम्ही आहोत बांधील
आमच्या आतील....अस्तित्वाच्या....आदिम भीतीला...आणि पाशवी नीतीला
जगण्याचा आमचा हक्क अबाधित राहण्यासाठी
तुमचा मृत्यू निश्चित आहे मि. गांधी.
नो नो नो,
मला पटवून देण्याचा कोणताच प्रयत्न करू नका
मी कानावरती घट्ट स्कार्फ बांधून आलो आहे
तुमचे ते भुलविणारे शब्द ऐकायचे नाहीत मला
माझा निर्णय पूर्ण झालाय...
हे पहा, हे पहा मि. गांधी,
मी वाकलोय क्षणभर तुमच्या पायावर...नमस्कारासाठी
ही माझी कृती केवळ माझ्या त्या अज्ञानापोटी
जग तरीही तुम्हाला का मानतं हे मला कधीच कळलं नाही म्हणून
आणि या पहा माझ्या हातातील पिस्तुलातून.....
सुटतील आता गोळ्या....तुमची वृध्द छाती भेदण्यासाठी.
एक सूचना आहे मि. गांधी
फक्त मरताना थोड्या मोठ्या आवाजात म्हणा
तुमचे ते ....हे राम की राम राम !
मि. गांधी, मि. गांधी,
आणखी एक शेवटचा सल्ला ऐकून जा...निर्वाणीचा
परमेश्वराशी तुमची जर जराही जवळीक असेल ना ...तर
तर मग मागा त्याच्याजवळ मुक्ति तुमच्यासाठी.
पुन्हा याच भूमिवर येण्याची चूक करू नका.
आमच्याच माणूसपणावर शंका घेणारे,
प्रश्न नको आहेत आम्हाला....मि.गांधी
अलविदा मि. गांधी.....अलविदा

ठो..........ठो...........ठो