हो हो , तूच फक्त चिडली नाहीस
मी सुध्दा चिडलो आहे
कारण काही विचारू नकोस
मी सुध्दा चिडलो आहें
काय गुन्हा झाला एवढा ?
.म्हणून रुसवा डोंगराएवढा
चूक एखादी होते कारण
माणूस म्हणून घडलो आहे ............ मी सुध्दा चिडलो आहे
आकाशाचा संदेश घेवून पक्षी
मातीचे उड़त असतात
भेटत नाहीत कधी तरीही
आकाश धरा चिडत नसतात
अन्तर राखून जगतात कसे
कोडयाने या पिडलो आहे ............मी सुध्दा चिडलो आहे
सागरालाच ओढ़ नाही
नदी का गं म्हणत नाही
जागेवरती उसळतो म्हणून
चिडून का गं रुसत नाही
तरी धावते आवेगाने
का? या चिंतेत पडलो आहे ............मी सुध्दा चिडलो आहे
( ती हसू लागते )
हसू नकोस जीवघेणी
राग माझा पळवू नकोस
मीही चिडलोय खराखुरा
निश्चय माझा ढळवू नकोस
माहीत आहे मनाने मी
जरी तुझ्याशी जोडलो आहे .............मी सुध्दा चिडलो आहे
( आता अबोला असह्य होतोय म्हणून हा तहाचा युक्तीवाद )
पण आकाशाच्या निखा-याने
फुले सुध्दा फुलतात की
मौनामध्ये अंधाराच्या
शब्दचान्दन्या खुलतात की
झाडामध्ये अडला वारा
सूर बनून सरकत आहे
चिडलो आपण दोघे तरीही
बोलायला काय हरकत आहे?
2 comments:
वा! मस्तच जमलीये कविता!
त्यातली रूपकं आणि यमकं, विषय आणि आशय- सगळंच आवडलं.
very nice
Post a Comment