Saturday, August 8, 2009

सवाल बापपिढीला

काय दिलतं आम्हाला तुम्ही?
निरोधातच अडकविलात तुम्ही तुमच्या सृजनशील वीर्याचा थेंब
आवेगाच्या अन् उत्साहाच्या प्रत्येक क्षणाला बहाल केलतं हे वांझोटेपणाचं दान
तुम्हीच तुमच्या अस्तित्त्वाचं कोडं तुम्हालाच सुटलं नाही तरीही
त्या मोहग्रस्त जगण्याचं दुःख चिटकवलतं आमच्या कपाळी
अन् तारुण्याच्या उन्मादातील अनावर वासनेत
वर्षानुवर्षे वीर्य झिजल्यावर थकलेल्या देहानं आणि मनानं
म्हातारपणची काठी म्हणून जन्माला घातलत आम्हाला
काय दिलतं आम्हाला तुम्ही ?
स्वाभिमानाचं पागोटे सोडून उभे राहिलात लाचारीने परकीयांच्या दाराशी
अन् वैश्विकतेच्या गप्पा मारत संस्कृतीचं लाजेचं शेवटचं वस्त्रही
टाकलत काढून आपल्याच पायाशी
काय अनुभवलयं स्वातंत्र्य तुम्ही ?
मुक्ततेचा सम्बन्ध असा नग्नतेशी लावलात
अन् पायावर उभे राहण्याचा लाचारीशी
निरर्गल वासना अन् उपभोगाच्या अश्वासाठी दूर सारलीत
संस्कृतीची कामधेनु तुम्ही
अन् वाढत्या मजल्यांच्या संस्कुतीकडे पाहात लाथाडल्या
समाधानाच्या पर्णकुटी तुम्ही
व विसरलात तेव्हा की
कुठल्याच मजल्याला स्वत:ची जमीन नसते म्हणून
स्वत:ला घेत राहीलात नेहमी दुस-याकडूनच इंधन
अन् विसरलात तेव्हाही की
ज्या प्रकाशाचं इंधन त्याच्या पोटातच असतं ना
तो विझत नाही कधीही
असच परावलम्बी अन् निरुद्देशी आयुष्य जगलात जन्मभर
अन् आता स्वानंदाच्या हस्तमैथूनाने थकलेल्या तुमच्या हातामध्ये
त्राणही नाही आमच्या फड्फडणा-या ज्योतीभोवती
ओंजळही धरण्याचं
पण इथून पुढं तुमच्या कर्माचं फळ म्हणून
तुमच्या पराभवाचा डाग मिरवीत जगणार नाही आम्ही
जन्माला येणं नसलं आमच्या हातात तरीही
तुमच्या चुकाच्या सजा भोगण्याऐवजी फुलवू जगवू
आमचं अस्तित्त्व आम्ही
स्वयम्भू बनून
कारण जगणं आणि मरणं अजूनही
आमच्या हातात आहे
अन् हेही लक्षात ठेवा अजूनही की
आमचं आयुष्य असली तुमची निर्मिती तरीही
पुनरावृत्ती नक्की नाही
पुनरावृत्ती नक्की नाही

1 comment:

Harshal said...

visheshan suchat nahi...
pan kavita aavadli. jaljalit ase kahitari janavtay.